Gadchiroli Accident : व्यायामाला गेले अन्…; गडचिरोलीत ६ तरुणांना ट्रकची जोरदार धडक, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर

Gadchiroli Accident | गडचिरोलीत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काटली गावात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने धडक दिली. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर गावकऱ्यांकडून गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात आला आहे.
याप्रकरणी गावकऱ्यांनी वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातातील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोघांचा गडचिरोली रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला.
इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. Gadchiroli Accident |
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर
राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे फडणवीस म्हणाले.
“या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. Gadchiroli Accident |
हेही वाचा :





