Accident News : केरळमध्ये भीषण अपघात! तमिळनाडूतील 8 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत (Accident News) तमिळनाडूतील ८ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Accident News : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत (Accident News) तमिळनाडूतील ८ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास कैपमंगलम येथील पनमबिक्कुन्नू परिसरात घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी गुरुवायुरकडून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होते. महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र पासिंगचा एक ट्रक नियमबाह्यपणे रस्त्याच्या उजव्या बाजूला उभा करण्यात आला होता.
कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वळणाच्या बॅरिकेड्सकडे आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकाकडे लक्ष गेले नाही, ज्यामुळे कार थेट ट्रकवर मागून जाऊन धडकली.ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघातात (Accident News) ६ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य २ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सूर्या, युवासंजित, जोशुआ, मुरली, जीवा, संतोष, प्रसन्ना आणि विश्व ही मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशामक दल आणि पोलिसांनी तात्काळ सुटका मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. कैपमंगलम पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपासादरम्यान पोलिसांना विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांवरून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. काही विद्यार्थ्यांच्या पालकांना ते केरळला गेल्याची माहितीही (Accident News) नव्हती. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष या विद्यार्थ्याने नुकतीच नवीन कार खरेदी केली होती आणि सर्वांनी कोचीला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, नवीन कारचे नोंदणी काम बाकी असल्याने त्यांनी भाड्याने कार घेऊन हा प्रवास सुरू केला होता.






