बल्लारी – राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेसाठी खांबाला झेंडे बांधत असताना मोका गावाजवळ चार जणांना विजेचा धक्का बसल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. ही बातमी कळताच राहुल गांधी आणि कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. या चौघांनाहीं कॉंग्रेस पक्षातर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
या लोकांची आपण रूग्णालयात जाऊन भेट घेतली, सुदैवाने त्यांना फार मोठी दुखापत झालेली नसून ते आता बरे होत आहेत असे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे. यात्रेत सहभागी असलेल्या सर्वांनी सुरक्षेची खबरदारी घ्यावी आणि आपले काम करताना अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.
#BharatJodoYatra : मुख्यमंत्री गेहलोत यांचे भाजपावर टीकास्त्र, म्हणाले “यूपीएला बदनाम करून…”
राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची यात्रा गेले 17 दिवस कर्नाटकात आहे. यात्रेचा कर्नाटकातील प्रवास 20 ऑक्टोबर रोजी संपणार असून त्यानंतर हीं यात्रा पुढील राज्यात मार्गस्थ होणार आहे. यात्रेचा 17 वा दिवस आज सकाळी येथील संगनकल्लू येथे सुरू झाला. ही यात्रा आज बेन्नीकल्लू येथे मुक्कामाला थांबणार आहे.