Pimpri: अनोळखी व्यक्तीची मदत घेणे पडले महागात! मदतीच्या बहाण्याने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न
Pimpri: पाच जणांकडून अत्याचार

पिंपरी – डोळ्यांत मोठी स्वप्ने होती. शिकायचे होते. स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेला एक घाईचा निर्णय एका १९ वर्षीय तरुणीला आयुष्यात कधीही न विसरता येणाऱ्या वेदनांच्या अंधारात घेऊन गेला.
सोशल मीडियावर झालेली अनोळखी व्यक्तीशी ओळख तिला मदतीचा आधार वाटली. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिला अत्याचाराच्या भयंकर सापळ्यात ओढण्यात आले. तिच्यावर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केले.
उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेलेल्या तरुणीला महाविद्यालयातील उपस्थिती कमी असल्याने परीक्षेला बसण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ती निराश होऊन घरी परतली. शिक्षणाचे वर्ष वाया जाण्याची भीती तिच्या मनात होती. त्यामुळे पुन्हा दिल्लीला जाण्याचा तिने पालकांकडे आग्रह धरला. मात्र, मुलीचे वय आणि तिची सुरक्षितता लक्षात घेऊन पालकांनी तिला परवानगी दिली नाही.
प्रभात इम्पॅक्ट : देहू परिसरात अमली पदार्थांविरोधात विशेष पथकाची नियुक्ती
पालकांचा नकार तिला त्या वेळी कठोर वाटला. मनात अस्वस्थता वाढत गेली. याच काळात सोशल मीडियावर तिची शहरातील ३७ वर्षीय व्यक्तीशी ओळख झाली. त्याने तिच्या अडचणीचा अंदाज घेत मदतीचे आश्वासन दिले. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाचे तिकीट काढून देतो, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला.
कुटुंबीयांना न सांगता ती त्याच्यासोबत गेली. त्याने तिला गहुंजे येथील एका सोसायटीतील सदनिकेत नेले आणि मदतीचा मुखवटा गळून पडला. त्या तरुणीचे ओरिजनल कागदपत्रे आणि मोबाइल काढून घेतला. तरुणीला दोन दिवस सदनिकेत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर धमकी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीने आपल्या मित्रालाही तेथे बोलावले. त्यानेही तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
डेटींग अॅपवरुन देहव्यापार
आरोपीने तिला नवीन फोन घेऊन दिला. त्यावर डेटींग ॲप डाऊनलोड केले. देहविक्रीसाठी त्यावर तरुणीची रोझी नावाने प्रोफाइल तयार केले. सेक्स रॅकेटसाठी या तरुणीला दोन वेळा मुंबई आणि एकदा अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथे तिच्याकडून देहविक्री करून घेत ग्राहकांकडून पैसे उकळण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
स्वप्नांच्या दिशेने निघालेल्या या तरुणीचे आयुष्य अक्षरशः नरक बनले. सुटकेची संधी शोधत तिने आरोपीचा विश्वास संपादन केला. ‘मला एकदा आईला भेटायचे आहे,’ अशी विनंती तिने केली. अखेर आईला भेटण्याची संधी मिळताच ती घरी परतली आणि आईला सर्व प्रकार सांगितला. अत्याचाराची कहाणी ऐकताना आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
मात्र, आईने धीर न सोडता मुलीला घेऊन थेट शिरगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार तसेच मुंबई आणि अहमदाबाद येथील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान आरोपीच्या सदनिकेत आणखी एका तरुणीची ओरिजनल कागदपत्रे आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
वेळीच शोध घेतला असता तर…
मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पालकांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांनी तिचा शोध घेतला नाही. जर तिचा शोध घेतला असता तर कदाचित तिच्यावर होणारे अत्याचार काही प्रमाणात थांबविता आले असते, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
‘या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाचे २८ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’ – प्रवीण मोरे, सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग
Satara: पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ





