Satara: पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ
Satara मॅरेथॉनच्या दोन दिवस आधी होणारा हा एक्स्पो केवळ विविध स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, रनिंग, फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. देशभरातून साताऱ्यात दाखल होणाऱ्या धावपटूंमुळे एक्स्पोमध्ये मॅरेथॉनपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, सातारकर नागरिकांनाही या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

Satara: सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने १४ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे यावर्षी १५ वे वर्ष असून देशभरातून सुमारे १० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. यावर्षीचा ‘मॅरेथॉन एक्स्पो’ दि. ४ आणि दि. ५ सप्टेंबर रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोच्या मंडप उभारणीचा शुभारंभ काल दि. २४ रोजी अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व भूमिपूजन करून करण्यात आला. यावेळी पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे आणि सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनीही श्रीफळ वाढवून मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक अभिषेक भंडारी, अजिंक्यतारा कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार महेंद्र (आबा) जाधव उपस्थित होते.
यावर्षी एक्स्पोसाठी ‘जर्मन हँगर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या मंडपाचे संकल्पनात्मक डिझाईन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी केले आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या धावपटू आणि नागरिकांना प्रशस्त, सुरक्षित व आरामदायी वातावरण मिळावे याचा विचार या डिझाईनमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मंडप संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. या मंडप उभारणीची जबाबदारी मंडप कॉन्ट्रॅक्टर भाऊ भोसले व जितेंद्र भोसले यांनी स्वीकारली आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध नामांकित संस्था व कंपन्या आपल्या उत्पादनांचे व सेवांचे स्टॉल्स उभारणार आहेत. यामध्ये स्पोर्ट्स, रनिंग, फिटनेस, आरोग्य, पोषण तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने व उपक्रमांची माहिती धावपटू आणि नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे धावपटूंसोबतच फिटनेस व आरोग्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठीही हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरणार आहे.
मॅरेथॉनच्या दोन दिवस आधी होणारा हा एक्स्पो केवळ विविध स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, रनिंग, फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. देशभरातून साताऱ्यात दाखल होणाऱ्या धावपटूंमुळे एक्स्पोमध्ये मॅरेथॉनपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, सातारकर नागरिकांनाही या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘जर्मन हँगर’ तंत्रज्ञानामुळे उभारण्यात येणारा हा भव्य आणि संपूर्ण वातानुकूलित एक्स्पो मंडप सातारकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे सातारकर नागरिकांनी या एक्स्पोला आवर्जून भेट देऊन देशभरातून सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या उत्साहाचा अनुभव घ्यावा, तसेच विविध स्टॉल्स, उत्पादने व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी केले आहे.





