प्रभात इम्पॅक्ट : देहू परिसरात अमली पदार्थांविरोधात विशेष पथकाची नियुक्ती
अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती

देहूगाव – देहू परिसरातील गर्दुल्यांचा वाढता वावर आणि अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने रविवारी (दि. २३) प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची देहूरोड पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंद्रायणी नदी घाट, मुख्य मंदिर, गाथा मंदिर परिसर, स्मशानभूमी, नगरपंचायत दर्गा, मरीआई माता मंदिर, विठ्ठलवाडी आणि खंडोबा मंदिर परिसरासह विविध ठिकाणी नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
काही ठिकाणी गांजा आणि अन्य अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांवर या वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही मुले नशेच्या आहारी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक संशयित ठिकाणी अचानक आणि अवेळी धाडसत्र राबविणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अल्पवयीन मुलांना नशेपासून दूर ठेवण्यासाठीही पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. पालकांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष द्यावे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दैनिक प्रभातने उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नाची पोलिसांनी तातडीने दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
FDA Actions : अस्वच्छता, भेसळ, तीन खाद्य आस्थापनांवर कारवाई





