पंतप्रधान आवास योजनेला गती द्या; राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

पुणे – पंतप्रधान आवास योजना (शहरी) ही सर्वसामान्य लाभार्थींसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रकल्पांना गती देणे गरजेचे आहे. ज्या प्रकल्पांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ती कामे तातडीने सुरू करून दर आठवड्याला त्याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत राज्यात शासकीय अथवा खासगी भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी संयुक्त भागीदारी तत्वावर गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सावे यांनी या सूचना दिल्या. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे (महाहाऊसिंग) व्यवस्थापकीय संचालक अजित कवडे, अवर सचिव रवींद्र खेतले, प्रमुकुल बापट आदी उपस्थित होते.
महाहाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक कवडे यांनी सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या राज्यातील प्रकल्पांची माहिती दिली. सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात डिसेंबर 2015 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मंजूर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेमार्फत नियंत्रण केले जाणार आहे.





