IND vs PAK : पाकिस्तानची पराभवानंतर लज्जास्पद कृती, मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन मैदानातून काढला पळ, पाहा VIDEO

Mohsin Naqvi carrying the Asia Cup 2025 Trophy Video : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर आपले नाव कोरले. मात्र, सामन्यानंतर ट्रॉफी देण्याच्या समारंभात झालेल्या वादामुळे हा विजय चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय संघाने एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन मैदान सोडले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मोहसिन नक्वींचा व्हिडीओ व्हायरल –
भारतीय संघाने सामन्यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री नसते, तर भारतीय संघाने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली असती, असे सांगण्यात येत आहे. सामना संपल्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन पोडियमवर भारतीय संघाची वाट पाहत उभे होते. परंतु, भारतीय संघ त्यांच्यापासून काही अंतरावर स्टेडियममध्ये थांबून राहिला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर नकवी यांनी ट्रॉफी घेऊन मैदान सोडले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाकिस्तान क्रिकेटच्या या कृतीवर टीका होत आहे.
Mohsin Naqvi to Failed Marshal Asim Munir be like: Huzoor we lost the match but stole the trophy, you can now claim winning the Asia Cup exactly like Operation sindoor where we lost the war and but claimed victory. Typical Pakistanis. Chor!!! pic.twitter.com/LYuDI2Lk2N
— Raja Muneeb (@RajaMuneeb) September 28, 2025
भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा उडवला धुव्वा –
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. पहिल्या सामन्यात 7 गडी, दुसऱ्या सामन्यात 6 गडी आणि अंतिम सामन्यात 5 गडी राखून भारताने विजय मिळवला. अंतिम सामन्यात तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी पाकिस्तानचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली.
हेही वाचा – IND vs PAK : सूर्याचा मोठा निर्णय! सशस्त्र दल आणि पहलगाममधील पीडित कुटुंबांना देणार तब्बल ‘इतके’ कोटी
फिरकीपटू कुलदीप यादवने प्रथम गोलंदाजी करताना 4 गडी बाद केले, तर धावांचा पाठलाग करताना तिलक वर्माने 53 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली. या दमदार कामगिरीमुळे तिलक वर्माला सामन्याचा मानकरी (प्लेयर ऑफ द मॅच) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, या सामन्यानंतर ट्रॉफीवरुन बराच वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 ची ही फायनल क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.





