दौंडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता जाळ्यात, काय आहे प्रकरण?

पुणेः शासकीय ठेकेराकडून कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरिता आणि बिल देण्याकरिता पैसे मागितल्याचा प्रकार दौंडमध्ये घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाला तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यासह दौंड शिरूर उपविभागाचे उपअभियंता तसेच दौंडचे कनिष्ठ अभियंत्याला अटक केली आहे.
कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), उपविभाग दौंड शिरूरचे उप अभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५), दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने माहिती दिली. शासकीय ठेकेदाराकडून दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे पैसे मागण्यात आले होते.
नेमकं प्रकरण काय?
जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाने दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. ३ मार्च रोजी दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी केलेल्या कामाची पाहणी केली.
त्यांनी पुणे जिल्हा परिषदेकडून एस क्यू एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल, असे सांगितले. त्यासाठी कमिटीकरिता प्रत्येक कामापोटी सात हजार रुपये, १४ हजारांच्या लाच मागणी केली. तसेच कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजूरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ८०,००० रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने ११ व १३ मार्च रोजी केलेल्या कारवाईत संबंधित अधिकाऱ्यांनी लाच स्विकारल्याचे निषन्न झाले.
अधिकाऱ्यांकडून ती बॅग जप्त
कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्या कार्यालायात रात्री उशिरापर्यंत ठेकेदारांची गर्दी असते. यासंबंधी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुलर्क्ष करण्यात आले. आता लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पवार यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत एक बॅग अधिकाऱ्यांना सापडली असून त्या बॅगमध्ये तब्बल ८,५८,४०० रोख रक्कम मिळून आली आहे. ती रक्कम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असून याची चौकीशी केली जात आहे.





