पुणे – रावेत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक (एएसआय) राकेश पालांडे आणि महिला पोलीस अंमलदार राजश्री घोडे यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या दोघांविरोधात एसीबीने गुन्हा नोंदवला असून, त्यांच्याविरोधात एका वकिलाच्या आशिलाला अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात अनुकूल चार्जशीट सादर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एसीबीचे सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ४६ वर्षीय वकिलाच्या आशिलाविरोधात रावेत पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अंमलदार राजश्री घोडे करत होत्या. त्यांनी संबंधित वकिलाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. वकिलाने ही माहिती एसीबीला दिल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. त्यानुसार, महिला पोलीस अंमलदार घोडे यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तपासादरम्यान एएसआय राकेश पालांडे यांनी या लाच प्रकरणात सहकार्य केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपअधीक्षक सत्यशील वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.