ACB : भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती, टीम इंडियालाही दिले आहे कोचिंग…

Afghanistan Cricket Team Assistant Coach R. Sridhar : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. आता माजी भारतीय खेळाडू आणि माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे अफगाणिस्तानचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. अफगाणिस्तानला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत आर श्रीधर अफगाणिस्तानचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. यापूर्वी आर. श्रीधर यांनी टीम इंडियामध्ये रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात (कोचिंग) टीम इंडियासोबत काम केले होते. आता मात्र, श्रीधर अफगाणिस्तान क्रिकेट संघासोबत काम करणार आहेत.
आर श्रीधर हे हैदराबादकडून डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळले आहेत. या खेळाडूने 2001 मध्ये कोचिंग करिअरला सुरुवात केली. 2014 च्या अंडर-19 विश्वचषकादरम्यान ते भारतीय ज्युनियर संघासोबत जोडले गेले होते. यानंतर 2014 ते 2017 या काळात आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्याच वेळी, त्याच वर्षी ते भारतीय संघाशी जोडले गेले. श्रीधर हे लेव्हल-3 प्रमाणित प्रशिक्षक आहेत. एसीबीने म्हटले आहे की, भविष्यात श्रीधर यांना दीर्घ करार दिला जाऊ शकतो.
ACB name R. Sridhar as National Team’s Asst. Coach for New Zealand and South Africa Fixtures.
More: https://t.co/B8VZlnB10t pic.twitter.com/nmCuVpCqD9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 21, 2024
आर श्रीधर यांना कधीही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा नक्कीच दाखवली. श्रीधर यांनी 35 प्रथम श्रेणी सामने आणि 14 लिस्ट ए सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी अनुक्रमे 91 आणि 14 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, अलीकडेच राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानची टी-20 विश्वचषकातील कामगिरी उत्कृष्ट होती. अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी या संघाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक केले गेले होते.





