Kangana Ranaut : सात वेळा नोटीस बजावूनही गैरहजर! कंगनाच्या अडचणीत होणार मोठी वाढ; न्यायालयाने थेट सांगितलं…

Kangana Ranaut – चित्रपट अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा खासदार कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेले वक्तव्य महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सात वेळा न्यायालयाने नोटीस बजावूनही ती तारखांना उपस्थित राहिली नाही. त्यावर आता १५ जानेवारीला उपस्थित राहण्यास तिला सांगण्यात आले आहे.
खासदार, आमदार न्यायालयात बुलंदशहर येथे कंगना न पोहोचल्याने तिला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. न्यायालयाने कंगनाच्या तीन पत्त्यांवर नोटीस बजावली असून तिला १५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय किसान युनियन राष्ट्रपुत्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित गजेंद्र शर्मा यांनी नुकतीच खासदार कंगना राणौत यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. कंगनाने तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात गजेंद्र शर्मा यांनी खासदार-आमदार न्यायालयात दावा दाखल केला होता. भारतीय किसान युनियनच्या नेत्याचे वकील संजय शर्मा यांनी सांगितले की, कोर्टाने कंगनाला समन्स बजावले होते आणि तिला 4 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु कंगना कोर्टात हजर राहिली नाही.
यामुळे न्यायालयाने आता पुढील सुनावणीसाठी 15 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. कंगनाच्या वकिलाने शनिवारी कोर्टात आपले पॉवर ऑफ एटर्नी दाखल केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात तारखा झाल्या आहेत.





