‘या’ खेळाडूच्या अनुपस्थितीचा वर्ल्डकपच्या तयारीवर मोठा परिणाम… Hardik Pandya ने स्पष्टचं सांगितलं

मुंबई – भारतासह इतर टीमने देखील या वर्षाअखेरीस सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीची तयारी सुरु केली आहे. भारतीय टीममधील काही तरुण खेळाडू सध्या अनफिट असल्यामुळे टीमसाठी ही चिंतेची बाब आहे. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमुळे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या भारताच्या तयारीवर परिणाम होईल, असे मत भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केले आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे आणि तो पुनरागमन केव्हा करेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे टीमला त्याची उणीव चांगलीच जाणवणार आहे.
“श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीचा परिणाम होईल आणि आम्हाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल, पण तो लवकर परतला नाही तर आम्हाला यावर उपाय शोधावा लागेल. तो संघात असेल तर स्वागतार्ह आहे, पण तो नसेल तर पुढील वाटचाल कशी करायची याबाबत विचार करावा लागेल”. असं पंड्या यावेळी म्हणाला.
जखमी श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव आणि रजत पाटीदार हे सध्याचे दोन प्रबळ दावेदार आहेत. श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदारचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत समावेश करण्यात आला आहे.सूर्यकुमार यादवने T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये छाप पाडली आहे पण 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. आणि रजत पाटीदार पदार्पणाची वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघ या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





