अबाऊट टर्न : अगतिक गर्दी

– हिमांशू
प्रचंड गर्दी. त्यातून बाहेर पडण्यासाठी अपुरा मार्ग. प्रत्येकाची तिथं पोहोचण्याची धडपड. धडपडीतून पडझड. पडझडीतून चेंगराचेंगरी, घुसमट, तुडवातुडवी… आणि ‘मी कोण’याचा शोध घेणार्यांच्या गर्दीत ‘मी कसा जगू’हा प्रश्न पडता-पडताच आलेला अत्यंत वेदनादायी मृत्यू..! जे चित्र हाथरसमधल्या चेंगराचेंगरीचं तेच चित्र आपल्या समाजाचं. ज्या भोलेबाबाच्या सत्संगावेळी ही झुंबड उडाली, तो मूळचा कोण, त्याचं कूळ कोणतं, त्याचं पूर्वायुष्य काय, तो हेड कॉन्स्टेबलचा बाबा कसा झाला, त्यानं पोलीस खातं सोडलं की त्याला हाकललं, चेंगराचेंगरीत सव्वाशे लोक मेल्यावर तो कुठे गायब झाला, वगैरे प्रश्नांचा पाठलाग आता अक्षरशः वेड लागल्यासारखा सुरू झालाय. चेंगराचेंगरीची जबाबदारी ‘ङ्गिक्स’करण्यासाठी अहमहमिका लागलीय.
नेमेचि येणार्या प्रत्येक पावसाळ्यात जशी महानगरं तुंबतात आणि प्रत्येक वेळी नालेसङ्गाईकडे बोट दाखवून जसे हात झटकले जातात, तसंच हे! बाबा कोण हे कळेलच हो; पण बाबाच्या पायाची धूळ कपाळी लावण्यासाठी जिवाचा धोका पत्करणारे कोण, हा प्रश्न सोयिस्करपणे ऑप्शनला टाकला जाईल. आपल्या समाजात जी टोकाची अगतिकता मूळ धरून बसलीये, त्याची जबाबदारी ‘ङ्गिक्स’ करण्यासाठी काहीही होणार नाही आणि पुन्हा एकदा कुठेतरी अशीच चेंगराचेंगरी होईपर्यंत घोंगडं भिजत ठेवलं जाईल. हाथरसच्या घटनेवर चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौलव गावातून गुप्तधनासाठी अघोरी पूजेची बातमी आली आणि पुन्हा एकदा उत्तरार्धावरच चर्चा रंगली.
एखाद्या बाबाच्या चरणाची धूळ असो वा कथित गुप्तधन, ते मिळालंच पाहिजे ही अधीरता येते कुठून? रोज उठून कुठल्या ना कुठल्या शर्यतीत धावणार्या एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे हा. शर्यत आली की जिंकणं-हरणं आलंच. मुळात जिथं शंभर लोक बसू शकतील, तिथं बसण्यासाठी दहा हजार लोक धावत असतील, तर चेंगराचेंगरी होणारच.शंभर विजेत्यांची मिरवणूक निघते आणि नऊ हजार नऊशे अपयशी लोकांना सातत्यानं दुर्लक्ष, निंदानालस्ती आणि अवहेलनेला सामोरं जावं लागतं. कधीकाळी ‘उत्तम’ मानल्या गेलेल्या शेतीची आज अस्मानी आणि सुलतानी संकटांनी माती केलीये.
निम्म्याहून अधिक लोकसंख्या ज्यावर अवलंबून, त्या शेतीसाठी विशेष असं काही करण्याची इच्छाशक्ती तर दिसत नाहीच; पण तीस रुपये मोजून मूठभर चिप्स खाणार्यांना, त्यातले किती रुपये बटाटा पिकवणार्या शेतकर्याला मिळतात, हाही प्रश्न पडत नाही. मग शेतीवर ‘भार’ ठरलेले ‘अतिरिक्त’ लोक शहरातल्या गर्दीत चेंगरायला येतात. स्थिरस्थावर लोकांना अंदाजही करता येणार नाही, इतकी अस्थिर लोकांची संख्या आहे. ही अस्थिरताच अगतिकता बनून कुणाच्या पायधुळीत किंवा गुप्तधनात भवितव्य शोधते आहे.
एका बाबाची चर्चा संपते ना संपते, तोच दुसर्याची सुरू होते. मध्यंतरी प्रत्येक समस्येवर विक्षिप्त उपाय सांगणारे एक बाबा चर्चेत होते. त्यानंतर ‘मनातलं ओळखून’ समस्या सोडवणारे बाबा आले. ही बाबामंडळी आलिशान मोटारींचा ताङ्गा घेऊन ङ्गिरतात. सर्वपक्षीय नेते केवळ गर्दी पाहून त्यांच्या दारी येतात;पण चेंगराचेंगरीत मरणार्यागर्दीला‘बाप’ नसतो. एकीकडे ‘हे लोक नादी लागतातच कसे,’ हा सवाल असतो आणि दुसरीकडे शोक, आर्थिक मदत, चौकशांचा ङ्गार्स..! अगतिकता मागील पानावरून पुढे चालू..!





