अबाऊट टर्न : लग्नप्रयोग

– हिमांशू
प्रेम सगळ्यांचं सेम असेल; पण लग्न सगळ्यांचं सेम असत नाही. किंबहुना कुणीही, कुणाशीही, कुठल्याही पद्धतीनं, कुठल्याही हेतूनं लग्न केलेलं असलं तरी प्रत्येक लग्न हा खरंतर एक ‘प्रयोग’ असतो असं म्हणायला हरकत नाही. समाजशास्त्रात कुटुंब, विवाह, धर्म, राज्य, अर्थ आणि शिक्षण या सहा सामाजिक संस्था सांगितल्या आहेत. कुटुंब ही मूलभूत सामाजिक संस्था असून, स्त्री-पुरुषांना कुटुंबसंस्थेत प्रवेश देणारी संस्था अशी विवाहसंस्थेची व्याख्या करण्यात आली. विवाह हा प्रथेनुसार किंवा कायद्यानुसार होऊ शकतो. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो एकटा जगू शकत नाही. एका व्यक्तीच्या इतर व्यक्तींवर असलेल्या अवलंबित्वामुळे सामाजिक संस्थांचा जन्म होतो आणि मग त्या त्या संस्थेचे काही अलिखित नियम ठरतात, असं समाजशास्त्र सांगतं.
अर्थातच एकमेकांवरील अवलंबित्वातून एकत्र येणारे स्त्री-पुरुषही काही नियमांना बांधील असतात. ही बांधिलकी कमी झाली की कुरबुरी सुरू होतात आणि बांधिलकी राहिलीच नाही की लग्न मोडतं. प्राचीन काळात ब्रह्मविवाह, देवविवाह, आर्श विवाह, प्रजापत्य विवाह, गांधर्वविवाह असे बरेच प्रकार अस्तित्वात होते असं सांगितलं जातं. वस्तुतः हेसुद्धा नातं जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी केलेले ‘प्रयोग’च असावेत. आधुनिक काळात प्रामुख्यानं अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज हे प्रकार आकाराला आले. त्यानंतरही वेगवेगळी ‘मॉडेल्स’ तयार करून जास्तीत जास्त ‘परङ्गेक्ट मॅरेज’चा शोध घेतला गेला.
लग्नच न करता एकत्र राहण्याचा ‘लिव्ह-इन’ प्रयोगही आपल्याकडे ङ्गारसा यशस्वी झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे या संस्थेवरचा विश्वास उडालेल्या काही व्यक्तींनी ‘सेल्ङ्ग मॅरेज’चा मार्ग स्वीकारला. खरंतर असं लग्न म्हणजे एकप्रकारे अविवाहितच राहणं. पण मग लग्नातली हौसमौज करायची राहून जाते म्हणून ‘सेल्ङ्ग मॅरेज’! यात अवलंबित्वच नसल्यामुळे हे लग्न टिकायला हवं. पण ‘सेल्ङ्ग मॅरेज’ करणार्यांपैकी अनेकांनी नंतर इतर कुणाशीतरी लग्नं केलंच. लग्नाची ही प्रायोगिक यात्रा आता ‘ङ्ग्रेंडशिप मॅरेज’ या अनोख्या वळणावर येऊन ठेपली. यात स्त्री-पुरुष कायदेशीर लग्न करून एकत्र राहतात; पण त्यांच्यात पती-पत्नीसारखं नातं नसतं.
म्हणजे ‘लिव्ह-इन’च्या बरोबर उलट! जपानमधून सुरू झालेल्या या ‘प्रयोगा’त सामान्यतः एकसारख्या आवडीनिवडी असलेले स्त्री-पुरुष एकत्र येतात. पण होस्टेलमध्ये रूममेट ज्याप्रकारे राहतात, तसेच ते मित्रांसारखे राहतात. त्यांच्यात रोमँटिक संबंध नसतात. दोघांना जर एकमेकांपासून मूल हवं असेल, तरी त्यांनी ते तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्माला घालणं या प्रकारात अभिप्रेत आहे. एकमेकांसमवेत वेळ आनंदात घालवणं, घरातले खर्च आणि कामं वाटून घेणं, एकमेकांना सुखदुःख शेअर करणं, हे नात्याचं स्वरूप!
जपानमध्ये सुमारे पाचशे जोडपी अशा प्रकारे एकत्र आल्याचं सांगितलं जातंय तर सिंगापूरमध्येही हा ‘ट्रेन्ड’ लोकप्रिय होतोय म्हणे! खरंतर हाही ‘प्रयोग’च आहे आणि महागडी घरं ‘शेअर’ करण्याच्या गरजेतून ही संकल्पना पुढे आली असावी, असं काहीजणांना वाटतं. काही का असेना, या प्रयोगातले गुणदोष, ङ्गायदे, मर्यादा पुढं येतील आणि पुन्हा एकदा शोध सुरू होईल नव्या मॉडेलचा! पण, प्रत्येक जोडप्याने स्वतःचे नियम ठरवणं आणि ते पाळणं हाच त्यातल्या त्यात कमी रिस्क असलेला प्रयोग!





