Abishek Porel : खळबळजनक ! युवा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक ; काय आहे नेमकं प्रकरण?
बंगालचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक पोरेलला (Abishek Porel) लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंगच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे.

Abishek Porel : बंगालचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक पोरेलला (Abishek Porel) लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंगच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी हुगळी जिल्ह्यातील मगरा पोलीस ठाण्याला अभिषेकसह (Abishek Porel) अन्य एका आरोपीला तात्काळ अटक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने न्यायालयात कोणीही उपस्थित नव्हते.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने अभिषेक पोरेल आणि त्याच्या साथीदारावर बलात्कारासह इतर गंभीर आरोप केले आहेत. प्रेमाचे जाळे फेकून लैंगिक शोषण करण्यात आले तसेच खाजगी फोटो काढून ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल करण्यात आल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आधीच मगरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपींचे मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली नव्हती.
पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, आरोपींच्या फोनमध्ये अजूनही ते आक्षेपार्ह खाजगी फोटो उपलब्ध आहेत. केवळ याच तरुणीचे नव्हे, तर अन्य मुलींचेही खाजगी फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केले गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
त्यामुळे हे फोटो अन्यत्र कुठेही प्रसारित होऊ नयेत यासाठी आरोपींचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने जप्त करण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पोलिसांना तात्काळ उपकरणे जप्त करण्याचे आणि अटकेबाबत काय पावले उचलली याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
आरोपी अभिषेक पोरेल (Abishek Porel) हा २३ वर्षांचा असून तो घरगुती क्रिकेटमध्ये बंगालचे तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो. वृद्धिमान साहाच्या निवृत्तीनंतर बंगाल संघाच्या यष्टीरक्षणाची मुख्य जबाबदारी त्यानेच सांभाळली आहे. त्याने ३२ प्रथम श्रेणी सामन्यांत १४०८ धावा केल्या असून त्यात १ शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे, तसेच यष्टीमागे ११४ झेल टिपले आहेत.
२०२३ मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱ्या अभिषेकने २०२४ च्या हंगामात १४ सामन्यांत १५९ च्या स्ट्राइक रेटने ३२७ धावा केल्या होत्या, तर २०२५ मध्ये १३ सामन्यांत ३०१ धावा नोंदवल्या होत्या. मात्र, यंदाच्या हंगामात त्याला खेळण्याची फारशी संधी मिळालेली नव्हती.






