Abhishek Sharma : अभिषेक शर्माने ठोकलं वादळी शतक! रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी

१२ चेंडूत अर्धशतक, पुढच्या २० चेंडूत शतक!
३० नोव्हेंबर रोजी झालेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासूनच बंगालच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याचा साथीदार प्रभसिमरन सिंहसोबत मिळून त्याने बंगालच्या गोलंदाजीला अक्षरशः नेस्तनाबूत केले.
या स्फोटक फलंदाजीचा परिणाम असा झाला की, अभिषेकने अवघ्या १२ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर तो अधिकच आक्रमक झाला आणि त्यानंतरच्या केवळ २० चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले. अशाप्रकारे, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३२ चेंडूंवर शतक ठोकण्याचा मोठा पराक्रम केला.
या शतकी खेळीमध्ये त्याने ७ चौकार आणि ११ गगनभेदी षटकार मारले. विशेष म्हणजे, बंगालकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमी आणि आकाश दीपसारख्या अनुभवी गोलंदाजांनाही त्याने सोडले नाही. शमीने पहिल्या २ षटकांमध्ये ३४, तर आकाश दीपने २ षटकांमध्ये ३० धावा दिल्या.
रोहित शर्माच्या ८ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी –
अभिषेक शर्माचे टी-२० क्रिकेटमधील हे आठवे शतक आहे. या विक्रमासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (८ शतके) याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता टी-२० मध्ये सर्वात जास्त शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याच्या पुढे फक्त विराट कोहली (९ शतके) आहे.
हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीला रांचीत इतिहास रचण्याची संधी! फक्त ‘इतक्या’ धावा आहे दूर
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे भारतीय फलंदाज:
- विराट कोहली – ९
- रोहित शर्मा – ८
- अभिषेक शर्मा – ८
- केएल राहुल – ७





