IND vs SA : विराट कोहलीला रांचीत इतिहास रचण्याची संधी! फक्त ‘इतक्या’ धावा आहे दूर

विराट कोहली करणार हा खास विक्रम –
विराट कोहलीने आजवर द्विपक्षीय वनडे मालिकांच्या इतिहासात १९६ डावांमध्ये ९९३६ धावा केल्या आहेत. जर कोहलीने रांचीतील सामन्यात ६४ धावा केल्या, तर तो द्विपक्षीय वनडे मालिकेत १०,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एमएस. धोनी आहे, ज्याने २०१ डावांमध्ये ७६६९ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि रांचीमध्ये दमदार रेकॉर्ड –
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीचा वनडे रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध ६५.३९ च्या सरासरीने १५०४ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. शिवाय, रांचीच्या मैदानावरही कोहलीचे आकडे खूप चांगले आहेत. रांचीत खेळलेल्या ५ सामन्यांतील ४ डावांमध्ये त्याने १९२ च्या सरासरीने ३८४ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहेत. त्याने १५ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध केलेले १३९ धावांचे नाबाद खेळी या मैदानावर भारतीय फलंदाजाने केलेला संयुक्तपणे सर्वोत्तम स्कोर आहे.
हेही वाचा – IND vs SA : दव अन् फिरकीचा खेळ! रांचीमध्ये टॉस ठरेल गेम चेंजर, विराट-रोहितवर सर्वांच्या नजरा
कामगिरी सुधारण्याची संधी –
यापूर्वीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला होता, तर शेवटच्या वनडेत त्याने नाबाद ७४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत तो मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. वनडे मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू परतले आहेत.





