Abhishek Sharma Six : अभिषेकचा ‘पॉवर’ शो! तिसऱ्याच चेंडूवर असा षटकार लगावला की अंपायर्सना चेंडूच बदलावा लागला, पाहा VIDEO
Abhishek Sharma Six : अभिषेक शर्माच्या षटकारामुळे अंपायरला चेंडू बदलावा लागला, ज्याच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Abhishek Sharma Six Ball Change Video Viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळवला जात आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वीचा हा भारताचा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना असल्याने सर्वांचे लक्ष युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदानात एकच खळबळ उडवून दिली.
एका षटकाराने बदलली चेंडूची ‘दशा’ –
भारतीय डावाच्या सुरुवातीला पहिल्या दोन चेंडूवर अभिषेकला धाव घेता आली नाही. मात्र, जॅकब डफीने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेकने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून असा गगनभेदी षटकार लगावला की सर्वजण अवाक झाले. हा फटका इतका जोरात होता की, जेव्हा चेंडू मैदानात परत आला तेव्हा त्याचा आकार (Shape) पूर्णपणे बदलला होता.
अभिषेक शर्मा सिक्सने चेंडूचा आकार बदलला
चेंडू खराब झाल्यामुळे पंचांना खेळाच्या तिसऱ्याच चेंडूवर नवा चेंडू मागवावा लागला. अभिषेकने या सामन्यात ३० धावांची खेळी केली, ज्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अखेर लॉकी फर्ग्युसनच्या एका वेगवान चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.
…and the *ABHI-SIX SHARMA SHOW* has begun! 🍿
He gets off the mark with a maximum. How many sixes will he smash tonight? 🤔#INDvNZ 5th T20I 👉 LIVE NOW ➡️ https://t.co/7DIDSDu12k pic.twitter.com/JcKdz8VIQl
— Star Sports (@StarSportsIndia) January 31, 2026
मालिकेत षटकारांचा पाऊस; मोडले रेकॉर्ड्स –
वर्ल्ड कपपूर्वी सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. या मालिकेत त्याने केवळ धावाच केल्या नाहीत, तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना दहशतीत ठेवले. त्याने पाच सामन्यात एकूण १८२ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याने स्ट्राईक ४५.५० च्या सरासरीने आणि तब्बल २४९.३२ च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली आहे.
या संपूर्ण मालिकेत अभिषेकने एकूण १५ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला होता. अभिषेकच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे टी-२० वर्ल्ड कपच्या सलामीच्या जागेसाठी त्याने आपली दावेदारी अधिक प्रबळ केली आहे.





