Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! डेव्हिड वॉर्नरनंतर ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा हैदराबादचा दुसराच खेळाडू
Abhishek Sharma Record : युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या आक्रमक फलंदाजीने केवळ संघाला भक्कम सुरुवातच करून दिली नाही, तर दिग्गज डेव्हिड वॉर्नरच्या एका खास विक्रमाशी बरोबरी करत इतिहास रचला आहे.

Abhishek Sharma Record 100 Sixes for SRH in IPL : ईडन गार्डन्सवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत २२६ धावांची उत्तुंग मजल मारली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत ८२ धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा या सामन्यात ४८ धावा करून बाद झाला असला, तरी त्याने हैदराबादच्या फ्रँचायझीसाठी खेळताना एक खास शतक पूर्ण केलं आहे.
अभिषेकने वॉर्नरच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री –
सनरायझर्स हैदराबादच्या इतिहासात १०० हून अधिक षटकार मारणारा अभिषेक शर्मा हा आता दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी केवळ माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (१४३ षटकार) यालाच ही किमया साधता आली होती. अभिषेकने २०१९ पासून हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना सातत्याने आक्रमक खेळ केला असून आज त्याने हेनरिक क्लासेन (९०) आणि केन विल्यमसन (६४) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
अभिषेक शर्माचा आयपीएल प्रवास –
२०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण करणाऱ्या अभिषेकला एकाच हंगामानंतर संघाने रिलीज केले होते. त्यानंतर हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो संघाचा मुख्य कणा बनला. आतापर्यंत ७९ आयपीएल सामन्यांत अभिषेकने २७.११ च्या सरासरीने १८७१ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएल कारकिर्दीत त्याचे एकूण १०६ षटकार पूर्ण झाले असून त्यापैकी १०१ षटकार त्याने एकट्या हैदराबादसाठी ठोकले आहेत. हैदराबादने दिलेल्या २२७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आता कोलकाता नाईट रायडर्सचा संघ काय रणनीती आखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





