Lionel Messi Controversy : फुटबॉल विश्वात मोठी खळबळ! लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाने केरळला फसवलं? क्रीडामंत्र्यांचा गंभीर आरोप
Lionel Messi Controversy : अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ आणि जगप्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सी यांनी केरळची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप क्रीडा मंत्र्यांनी केला आहे.

Lionel Messi Kerala Match Controversy 2026 : केरळमध्ये येऊन फुटबॉल सामना खेळण्याचे आश्वासन देऊन अर्जेंटिनाचा संघ आपल्या शब्दापासून फिरल्याचा दावा क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहीमान यांनी केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मंत्र्यांनी मेस्सी मार्च २०२६ मध्ये केरळला येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता ही योजना फिसकटल्याने आणि संघ न आल्याने मंत्र्यांनी थेट ‘धोका’ दिल्याची भाषा वापरली आहे.
२५० कोटींची तयारी अन् टीम गायब?
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिना संघाला केरळमध्ये आणण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांची तजवीज करण्यात आली होती. प्रायोजक शोधण्यापासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यापर्यंत सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ऐनवेळी संघाने पाठ फिरवली. मंत्र्यांनी असाही दावा केला आहे की, अर्जेंटिनाने केवळ केरळच नाही, तर इतर देशांकडूनही पैसे घेऊन तिथे सामने खेळायला न जाण्याचा प्रकार केला आहे.
कायदेशीर कारवाईचा बडगा –
“पैसे घेऊनही संघ न येणे हा थेट फसवणुकीचा प्रकार आहे,” असे म्हणत मंत्र्यांनी आता कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. अर्जेंटिना संघाकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सरकार खटला भरण्याच्या तयारीत आहे. केरळमधील लाखो फुटबॉल प्रेमींसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या प्रकरणामुळे मेस्सीच्या चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
निवडणुकीच्या रिंगणात क्रीडामंत्री –
या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी आपल्या राजकीय भविष्याबद्दलही भाष्य केले. केरळमध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अब्दुरहीमान यांनी आपल्या गृहक्षेत्रातून, म्हणजे ‘तिरुर’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. फुटबॉलचा हा वाद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.




