Abhishek Sharma Statement : अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजच्या प्लॅनवर कसा पडला भारी? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा
Abhishek Sharma Statement : अभिषेक शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या ३० चेंडूंमध्ये ६९ धावांची स्फोटक खेळी केली. सामन्यानंतर, आपण वेस्ट इंडिजच्या रणनीतीवर कसा मात केली हे त्याने स्पष्ट केले.

Abhishek Sharma Statement on Roston Chase Plan IND vs WI 3rd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३० चेंडूंत ६९ धावांची वादळी खेळी उभारली. सामन्यानंतर बोलताना अभिषेकने वेस्ट इंडिजच्या रणनीतीचा पर्दाफाश केला. कॅरेबियन संघाने आपल्यासाठी खास सापळा रचला होता, परंतु आपण त्याचा वेळीच तोडगा काढल्याचे अभिषेकने स्पष्ट केले.
रोस्टन चेसला आणून रचला होता सापळा; अभिषेकने फिरवले डावपेच
वेस्ट इंडिजने डावाची सुरुवात ऑफ स्पिनर रोस्टन चेसकडून करून घेतली आणि ऑफ साईडला अधिक क्षेत्ररक्षक तैनात केले होते. या रणनीतीबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की, “समोर ऑफ स्पिनर असताना ती आमच्या दोघांमधील थेट लढत होती. चेसने या मालिकेत प्रभावी गोलंदाजी केली असल्याने पहिल्या षटकात त्याला योग्य तो आदर दिला. जर विरोधी संघाने आपल्याविरुद्ध विशेष प्लॅन आखला असेल, तर त्यापेक्षा सरस खेळ करून दाखवण्याची जिद्द मनात होती आणि हा संयम अखेर फलदायी ठरला.”
विंडीजविरुद्ध कधीही गाफील राहून चालत नाही; अभिषेकचा इशारा
The Abhishek Sharma Show in Indore! 🤩
He brings up a scintillating 18-ball 5️⃣0️⃣ 🔥
#TeamIndia 87/1 after just 6 overs.
Updates ▶️ https://t.co/0ve4uDWSIn
#INDvWI | @mflone_ | @OfficialAbhi04 https://t.co/Uu4QRXiYrF
— BCCI (@BCCI) October 11, 2026
भारताने २२३ धावा उभारल्यानंतरही विंडीजने कडवी झुंज देत २०९ धावांपर्यंत मजल मारली. यावर अभिषेकने नमूद केले की, “वेस्ट इंडिज हा असा संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध सामना कधीही फिरू शकतो. दुसऱ्या सामन्यातील त्यांच्या विक्रमी रनचेसची आठवण प्रत्येकाच्या मनात ताजी होती. विंडीजचा कोणताही फलंदाज टिकून राहिला तर सामना खेचून नेऊ शकतो हे ठाऊक असल्याने भारताच्या विकेट्स पडत असतानाही संघाने आक्रमक आणि निर्दयी दृष्टिकोन कायम ठेवला होता.”
पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी कसून सराव
आपल्या आक्रमक फलंदाजीच्या यशाचे श्रेय अभिषेकने पूर्वतयारीला दिले. “पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांचा अधिकाधिक फायदा उठवणे ही आपली प्रमुख जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले. विरोधी संघाचा कोणता गोलंदाज आपल्याविरुद्ध काय रणनीती वापरू शकतो, याचा सखोल अभ्यास करून आपण मैदानावर उतरतो. गोलंदाजांच्या रणनीतीवर मात करण्यासाठी आधीच सराव केल्याने मोठी खेळी साकारणे सोपे जाते,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.





