Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनने व्यक्त केली ‘ती’ भीती; अनेक वर्षानंतर स्पष्टचं बोलला
Abhishek Bachchan : आता अभिषेकने पहिल्यांदाच करिअरच्या सुरुवातीला सतावित असणारी भीती नेमकी कोणती होती, याविषयी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चनने बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची २६ वर्षे पूर्ण केली आहेत. २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्री करीना कपूरसोबत अभिषेकने स्क्रिन शेअर केली होती. आता अभिषेकने पहिल्यांदाच करिअरच्या सुरुवातीला सतावित असणारी भीती नेमकी कोणती होती, याविषयी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मुलाखतीत अभिषेकने आपल्या अभिनयप्रवासातील बदल, वाढलेला आत्मविश्वास आणि करिअरकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “माझ्यात सर्वात मोठा बदल म्हणजे आता मी अधिक सहज आणि आत्मविश्वासाने कॅमेरासमोर उभा राहतो. सुरुवातीच्या काळात मी खूप अस्वस्थ असायचो.
मात्र अनुभव वाढत गेला तसं स्वतःमध्ये सहजपणा आला आणि त्यामुळे निर्णय घेण्याची स्पष्टताही वाढली. विशेषतः गेल्या पाच ते सात वर्षांत कोणते प्रोजेक्ट करायचे नाहीत, याबाबत मी अधिक ठाम झालो आहे. करिअरच्या सुरुवातीला काम मिळण्याची अनिश्चितता असल्यामुळे समोर येणाऱ्या बहुतांश संधी स्वीकाराव्या लागतात.” असे त्याने करिअरच्या सुरुवातीला सतावणाऱ्या काम मिळण्याच्या भीतीबद्दल स्पष्टपणे सांगितलं.
हेही वाचा : Bilawal Bhutto: “जर पाकिस्तानचे हक्क…” ; बिलावल भुट्टो अन् इशाक दार यांची भारताला धमकी
गेल्या २६ वर्षांत अभिषेकने ‘गुरू’, ‘धूम’, ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘ब्लफमास्टर’, ‘द बिग बुल’, ‘बॉब बिस्वास’, ‘दसवी’, ‘घूमर’, ‘आय वाँट टू टॉक’ आणि ‘बी हॅपी’ यांसारख्या विविध चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक भूमिकांसाठी त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनीही विशेष कौतुकही केले.
मात्र दुसरीकडे अभिषेकला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात तो अपयशी ठरल्याची टीका काहीजण करत असतात. या ट्रोलिंगला अभिषेकने कामातून उत्तर दिले असल्याचे त्याच्या चित्रपटातून दिसून येते.






