Abhijit Mukherjee : कॉंग्रेसनेच माझ्या वडिलांना घडवले; अभिजित मुखर्जी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकाबाबत देशात चर्चा सुरू आहे. नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीनेही या वादात उडी घेत अनेक दावे केले आणि काँग्रेसवरही अनेक प्रश्न उपस्थित केले. आता प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने या प्रकरणी बहिणीपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांचे विधान समोर आले असून, त्यात त्यांनी काँग्रेसवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. वडिलांच्या यशाचे श्रेय काँग्रेसलाच जाते, असे ते म्हणाले.
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या वडिलांनी सार्वजनिक जीवनात जे काही मिळवले ते केवळ काँग्रेसमुळेच. त्यावर ते पुढे म्हणाले की, मला वाटत नाही की यावर कोणताही वाद व्हावा. अभिजित मुखर्जी म्हणाले की, मी त्यांच्या (मनमोहन सिंग) अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही, परंतु हे देशाचे आणि काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. अंत्यसंस्कार हा कुटुंबियांचा हक्क आहे, त्यामुळे तो शीख प्रथेनुसार करण्यात आला आहे.
यावर काही वाद होऊ नयेत असे मला वाटते. आम्हाला त्यांचे स्मारक हवे आहे. मी सरकारला आवाहन करतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी सरकारला केलेल्या आवाहनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, त्यांनी याचा विचार करावा. अभिजीत मुखर्जी म्हणाले की, त्यांच्या वडिलांचे कोविड काळात निधन झाले, त्यामुळे अनेक प्रोटोकॉल आणि अनेक प्रकारचे निर्बंध आले. त्या काळात घातलेल्या निर्बंधांमुळे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावता आली नाही आणि श्रद्धांजलीही वाहता आली नाही. मात्र, नंतर समितीने कार्यक्रम आयोजित करून श्रद्धांजली वाहिली.
त्या काळात प्रशासनाने अनेक निर्बंध लादल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब आणि मित्रांमधील फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. काँग्रेसलाही रॅली काढायची होती, पण ते होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आले होते. माजी राष्ट्रपतींचे पुत्र अभिजित मुखर्जी म्हणाले की, काँग्रेसनेच माझ्या वडिलांना घडवले. नंतर राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांना जबाबदारी मिळाली. आपले वडील जे काही झाले ते काँग्रेसमुळेच झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेसनेच राष्ट्रपती पदासाठी त्यांना उमेदवार केले होते.





