ABC ID registration – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) संलग्न सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ऍकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ (एबीसी आयडी) तयार करणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी आणि गुणपत्रिका डीजीलॉकरवर उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश मंडळाचे प्रभारी सचिव चंद्रकांत कापसे यांनी दिले आहेत. मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ‘के-स्किम’ लागू केली आहे. या धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा करण्यासाठी एबीसी आयडी असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक संस्थेला अभ्यासक्रमनिहाय एका अधिव्याख्यात्याची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या एनरोलमेंट नंबर आणि पासवर्डच्या साहाय्याने लॉगिन करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच डीजीलॉकरद्वारे आयडी तयार केला आहे, त्यांनाही या पोर्टलवर लॉगिन करून आपली माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. निकाल, गुणपत्रिका डीजीलॉकरवर विद्यार्थ्यांचा निकाल आणि भविष्यातील सर्व गुणपत्रिका डीजीलॉकरवर अपलोड करण्यासाठी हा आयडी निकालाशी संलग्न केला जाणार आहे. त्यामुळे ही माहिती भरताना अचूकता राखणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे एकत्रितरीत्या मंडळाकडे प्राप्त होणार असल्याने संस्थांना स्वतंत्रपणे माहिती पाठविण्याची गरज नाही. तांत्रिक अडचणींबाबत विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.