नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सीईटी सेलने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे सहजशक्य व्हावे, यासाठी सीईटीसाठी अर्ज नोंदणी करताना अपार आयडी अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणी करताना हा १२ अंकी क्रमांक अनिवार्य असणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती सविस्तरपणे नोंदवली जावी, यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी सुरू केला आहे. या १२ अंकी अपार आयडीमुळे विद्यार्थ्याचे मिळवलेले श्रेयांक, गुणपत्रिका, पदवी, शिष्यवृत्ती आणि पुरस्कार याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तत्काळ उपलब्ध होते. हा आयडी सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी बंधनकारक करण्यात आला आहे. सीईटी नोंदणीदरम्यान अनेकदा विद्यार्थी नजरचुकीने चुकीची माहिती भरतात. ज्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळी अनेक अडचणी निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीईटी कक्षाने अपार आयडी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. अपार आयडीमुळे विद्यार्थी अर्ज नोंदणी करत असतानाच त्यांचा संपूर्ण शैक्षणिक तपशील सीईटी कक्षाला उपलब्ध होईल. शाळांमध्ये अपार आयडी आणि आधार यांची जोडणी होत असल्याने, विद्यार्थ्याची सत्यता पडताळणे या निर्णयामुळे अधिक सोपे होणार आहे.