ICC Hall of Fame 2024 : कुक, डिव्हिलियर्ससह भारताच्या नीतू डेव्हिडचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश…

ICC Hall of Fame 2024 : इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स व भारताची नीतू डेव्हिड यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. महान क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये कुक 113 व्या, नीतू डेव्हिड 114 व्या तर डिव्हिलियर्सला 115 व्या स्थानी समाविष्ट करण्यात आले आहे.
आयसीसीच्या वतीने 2009 मध्ये महान क्रिकेटपटूना सन्मानित करण्यासाठी हॉल ऑफ फेम सुरु करण्यात आले होते. यावर्षी भारताच्या नीतू डेव्हिडचा समावेश करण्यात आला आहे. नीतू डेव्हिड ही भारताची फिरकी गोलंदाज होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींची नोंद करणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज आहे. तिने 2005 मध्ये झालेल्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक 20 बळी घेतले होते. इतर कोणत्याही महिला गोलंदाजाला या स्पर्धेत 15 पेक्षा जास्त बळींची नोंद करता आली नाही.
An India legend – both on and off the field 🙌
Neetu David joins the game’s elite in the ICC Hall of Fame 🏅
More ⬇https://t.co/HhDFpKiknV
— ICC (@ICC) October 16, 2024
नीतू डेव्हिड यांनी 10 कसोटीमध्ये 18.90 च्या सरासरीने 41 तर 97 एकदिवसीय लढतीमध्ये 16.34 च्या सरासरीने 141 बळी टिपले आहेत. या यादीत समाविष्ट होणे हे सन्मान आहे. राष्ट्रीय संघाची जर्सी परिधान करणे हीच सर्वोच्च ओळख असते. या खेळासाठी आयुष्यभर समर्पण केल्यानंतर हा सन्मान मिळाला असल्याचे नीतू डेव्हिडने बोलताना सांगितले.
इंग्लंडच्या ॲलिस्टर कुकचा समावेश देखील या यादीत करण्यात आला आहे. कुकने 161 कसोटी, 92 एकदिवसीय व 4 टी-20 लढतीमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटीमध्ये कुकच्या नावावर 12 हजार 472 धावा असून एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 3 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याबरोअबरीने त्याने कसोटीमध्ये 33 शतके झळकावली असून 294 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
ॲलिस्टर कुक
161 कसोटी – 45.35 च्या सरासरीने 12,472 धावा
92 वनडे – 36.40 च्या सरासरीने 3,204 धावा
4 टी20 – 15.25 च्या सरासरीने 61 धावा
एबी डिव्हिलियर्स
114 कसोटी – 50.66 च्या सरासरीने 8,765 धावा
228 वनडे – 53.50 च्या सरासरीने 9,577 धावा
78 T20I – 26.12 च्या सरासरीने 1,672 धावा
यादीमध्ये शेवटचे नाव दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचे आहे. निवृत्त खेळाडूंपैकी फक्त डीव्हिलियर्सची वनडे आणि कसोटीमध्ये सरासरी 50 च्या वर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक, जलद शतक आणि जलद 150 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.




