Rahul Roy : ‘आशिकी’च्या हिरोवर आली अशी वेळ की….; राहुल रॅायचा धक्कादायक खुलासा म्हणाला ” आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी…”
Rahul Roy : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल रॉय यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला.

Rahul Roy : १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत प्रेमाची नवी व्याख्या मांडली. या चित्रपटातून अभिनेता राहुल रॉय रातोरात स्टार झाला. त्याच्या अभिनयाची आणि लूकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली होती. मात्र, ‘आशिकी’नंतर राहुल रॉयच्या करिअरला अपेक्षित अशी गती मिळाली नाही. मोठ्या चित्रपटांच्या संधी कमी होत गेल्या आणि पुढे अभिनेत्याला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल रॉय यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अभिनेत्याने लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करून पैसे कमावल्याचे सांगितले. एका कार्यक्रमातील सादरीकरणातून आपल्याला दोन ते चार लाख रुपये मिळत असल्याचे अभिनेत्याने स्पष्ट केले.
मात्र, या कामाबद्दल राहुल रॉय यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने स्पष्ट केलं की, मेहनत करून पैसे कमावण्याचा तो एक मार्ग आहे. त्यांच्या मते, कोणतंही काम लहान नसतं, विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा आपलं आयुष्य रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत असते.
‘घरखर्च भागवण्यासाठी जे शक्य आहे ते करतो’
२०२० मध्ये राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आणि काम मिळवणंही कठीण झालं होतं. या घटनेला आता जवळपास पाच वर्षे झाली असून, या काळात घरखर्च भागवण्यासाठी आपण शक्य ते सर्व काम करत असल्याचं अभिनित्याने सांगितलं.
राहुल रॉय म्हणातो, “कधीकधी मी लग्नसमारंभात नृत्य सादर करून दोन किंवा चार लाख रुपये कमावतो. आपल्या परिस्थितीशी जुळवून घेत पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहे.”
३० लाखांच्या कायदेशीर प्रकरणाचाही सामना
राहुल रॉय गेल्या काही वर्षांपासून सुमारे ३० लाख रुपयांच्या कायदेशीर प्रकरणाला सामोरे जात आहे. हे प्रकरण आपल्या भावासोबत मिळून सोडवण्याचा प्रयत्न आहे. काही वर्षांपूर्वी राहुल रॉय यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांनी आपली मालमत्ता पत्नीच्या नावावर हस्तांतरित केली होती.
‘आशिकी’ने दिली जबरदस्त लोकप्रियता
अभिनेता राहुल रॅायने १९९० मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने अभिनेत्री अनु अग्रवालसोबत स्क्रिन शेअर केली. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं आणि राहुल रॉय तरुणाईमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत ‘आशिकी’सारखं सातत्यपूर्ण यश मिळालं नाही.
पुन्हा अभिनयाच्या मैदानात उतरण्याची तयारी
आरोग्याच्या समस्यांनंतरही राहुल रॉय आता पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा ‘आग्रा’ हा कानू बहल दिग्दर्शित चित्रपट नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता.
आता राहुल रॉय त्यांच्या आगामी ‘सुपर बादशाह’ या प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहे. कुकू टीव्हीवरील या शोमध्ये ते अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये करणवीर बोहरा यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. एकेकाळी ‘आशिकी’मुळे रातोरात स्टारडम मिळवणाऱ्या राहुल रॉयचा संघर्षमय प्रवास आणि पुन्हा उभं राहण्याची त्यांची जिद्द सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.






