भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !

AAP | Office – आम आदमी पार्टीचा दिल्लीत पराभव झाल्यानंतर त्याचा परिणाम मध्य प्रदेशातही दिसून येत आहे. भोपाळमधील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाडे न भरल्यामुळे घरमालकाने भोपाळमधील आम आदमी पक्षाच्या सुभाष कार्यालयाला कुलूप लावले आहे. घरमालकाचे म्हणणे आहे की त्याला गेल्या दोन महिन्यांपासून भाडे मिळत नाहीये, म्हणूनच त्याने ऑफिसला कुलूप लावले आहे.
घरमालकाने सांगितले की माझ्या घराचे गेल्या दोन महिन्यांचे भाडे ५०,००० रुपये बाकी होते. भाडे दिले जात नव्हते, म्हणूनच आम्ही आता घराला कुलूप लावले आहे. हे कार्यालय मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सुभाष नगर येथे आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम येथूनच सुरू होते.
कार्यालयात होत असलेल्या घडामोडींनाही घरमालक विवेक गंगलानी यांचा आक्षेप होता. ते म्हणाले की, पक्ष कार्यालयात दारूचे बॉक्स येत असत. त्यांनी भाडे आणि वीज बिल भरले नाही. मी पोलिसांकडे तक्रार करेन.
दरम्यान, मध्य प्रदेशातील सिंगरौलीच्या महापौर राणी अग्रवाल या आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. राणी अग्रवाल यांनी महानगरपालिका निवडणुकीत आपच्या तिकिटावर महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.
त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हे सर्व काही गैरसमजामुळे घडत आहे. मी ५ मार्च रोजी तिथे एक बैठक घेईन आणि त्यानंतर माध्यमांशीही बोलेन.





