‘आप’ने सोडला काँग्रेसचा हात, दिल्लीतील पराभवानंतर केली मोठी घोषणा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने काँग्रेससोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. ते म्हणाले की, काँग्रेससोबतची युती केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती, पक्ष विधानसभा निवडणूक एकटाच लढवणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना गोपाल राय यांनी आपल्या पक्षाने विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्षाचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली. आम आदमी पक्षाचे उमेदवार चार जागांवर लढले होते आणि तीन काँग्रेसचे होते. मात्र, सर्वच जागांवर युतीला पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी ‘आप’ने एकट्यानेच पुढे जाण्याची घोषणा केली आहे.





