‘या’ राज्यात ‘आप’नेही थोपाटले दंड ! दहा उमेदवारांची यादी केली जाहीर.. काँग्रेसचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली – आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए विरोधात विरोधकांनी “इंडिया’ आघाडी उघडलेली आहे. या आघाडीत तब्बल 28 पक्ष सहभागी झालेले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. असे जरी असले तरी कॉंग्रेसला दिल्ली आणि पंजाबमध्ये धोबीपछाड देणाऱ्या आपने छत्तीसगडमध्ये सत्तेतील कॉंग्रेसविरुद्ध दहा उमेदवारांची यादी जाहीर करत दंड थोपाटले आहे.
लोकसभा निवडणुकांआधीच या वर्षाअखेर छत्तीसगडसह मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना आता आम आदमी पक्षाने छत्तीसगडसह मध्यप्रदेशमध्येही आपले दहा-दहा उमेदवार जाहीर केले आहेत. तेव्हा एकीकडे इंडिया आघाडीत राहायचे आणि दुसरीकडे स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे यावरून “आप’च्या मनात चालले तरी काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी बीएसपीने 8 ऑगस्ट रोजी 9 उमेदवार, तर भाजपने 17 ऑगस्ट रोजी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्या छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार असून, त्यांनी अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्याआधीच आम आदमी पक्षाने त्यांच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसला याचा फटका बसू शकतो, हे निवडणूक निकालावरून दिसून येणार आहे.





