10 लाख काय 1 हजार लोकांनाही नोकरी मिळाली नाही; कॉंग्रेसने केला “आप’चा पंचनामा

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये मोठे मोठे दावे करत असतानाच दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवालांच्या दाव्यांची हवा काढण्याचे काम करण्यात आले. पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्या सरकारकडे पैसे नाहीत. मात्र त्याच पंजाबच्या जनतेचे 36 कोटी रूपये केवळ दोन महिन्यांत गुजरातमध्ये पक्षाच्या जाहीरातबाजीसाठी खर्च करण्यात आले असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. अजय कुमार यांनी केला आहे.
दिल्लीत आम्ही 10 लाख लोकांना रोजगार दिल्याचा दावा केजरीवाल यांनी गुजरातमध्ये केला आहे. मात्र वस्तुस्थिती ही आहे की आतापर्यंत 1 हजार लोकांनाही नोकरी मिळू शकलेली नाही. गेल्या आठ वर्षांत केजरीवाल यांनी दिल्लीत एकही नवे हॉस्पिटल उभारले नाही. जी रूग्णालये दिल्लीत सध्या चालू आहेत ती सगळी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळातील आहेत असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
केजरीवालांच्या काळात दिल्लीत साधा एक उड्डाणपूल बांधण्यात आलेला नाही. शाळांच्या सुधारणांचा दावा केजरीवाल करत असतात. खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा उत्तम असल्याचे त्यांचे म्हणणे असते. मात्र जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकारी शाळा एवढ्याच चांगल्या आहेत तर पालक त्यांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये का पाठवत आहेत असे कॉंग्रेसने विचारले आहे.





