Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ‘आप’ही आरोपी; ‘ईडी’ची उच्च न्यायालयात माहिती

Arvind Kejriwal – दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दाखल केल्या जाणाऱ्या पुढच्या आरोपपत्रात ‘आम आदमी पार्टी’लाही आरोपी केले जाणार असल्याचे ईडीने आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणातील अनेक आरोपी सुनावणीला विलंब व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असताना ईडीकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी सिसोदिया यांच्या जामीनाला विरोध करत ईडीने आरोप केला की सुनावणीला विलंब होण्यासाठी आरोपींकडून ठोस प्रयत्न केले जात आहेत. २०२१ मध्ये दिल्ली सरकारने नवीन धोरण जाहीर केले होते.
मात्र २०२२ उजाडेपर्यंत या धोरणाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मद्य धोरण तयार करणे आणि ते लागू करण्यात कथित गैरप्रकार झाले असल्याचे नमूद करत दिल्लीच्या नायब राज्यपालांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता व या प्रकारामुळे दिल्ली सरकारने संबंधित धोरणच रद्द केले.





