Aamir Khan Meet Santosh Deshmukh Family : केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांचे कुटुंबीय करत आहेत. अनेक लोक आणि राजकीय नेते देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत. अशातच आता बॉलीवूड अभिनेता आमिर खानने संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले. बराच काळ आमिर खान देशमुख कुटुंबीयांसोबत चर्चा करत होता. पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात आमिर खान यांनी त्यांची भेट घेतली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाणी फाऊंडेशन या कार्यक्रमाला उपस्थिती होती. पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमीर खान, किरण राव, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पोपटराव पवार, कृषी आयुक्त सुरज मांढरे, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, अतुल कुलकर्णी, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी आदी मान्यवरांकडून तालुकास्तरीय विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
बालेवाडी येथील पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खान आणि किरण राव यांनी भेट घेतली. संतोष देशमुख यांचे गावासाठी असलेले काम आणि त्यांचा संघर्ष, याबद्दल कुटुंबियांनी माहिती दिली. यावेळी दोघांनीही देशमुख कुटुंबियांना हिंमत ठेवण्याचा सल्ला दिला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, संतोष देशमुख यांचा मुलगा यांची हे यावेळी उपस्थित होते.
आमिर खानशी बोलताना, संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. आमिर खानने संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख याला कडकडून मिठी मारली आणि त्याचे सांत्वन केले. देशमुख कुटुंबियांशी बोलताना आमिर खान काहीसा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, पाणावलेल्या डोळ्यांनी आमिर खान विराज देशमुखला मिठीत घेऊन त्याचे सांत्वन करत होता.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले होते. हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना आरोपींनी मारहाण केल्याचे फोटो व व्हिडीओ होते. संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आरोपींनी देशमुखांना मारहाण केली, तसेच त्यांच्यावर लघुशंकाही केली होती. संतोष देशमुखांचा छळ करत असताना आरोपी हसत होते.