अकलूज – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील पांडुरंग राऊत या व्यक्तीला गेल्या काही महिन्यापासूनपासून चालता येत नव्हते. त्यांच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपये खर्च येत होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते महिनोन्महिने तशाच परिस्थितीत दिवस काढत होते. ही बाब माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या कानावर पडली. त्यानंतर आमदारांमधील “राम” तत्परतेने जागा झाला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुंबई येथील रिलायंस रुग्णालयात सदाशिव नगर येथील पांडुरंगाच्या गुडघ्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली . परिणामी आमदारांच्या “राम” तत्परतेने पांडुरंगाच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला.
माळशिरसचे आमदार राम सातपुते सदैव आपल्या कामाची चुणूक समाजोपयोगी कार्यातून दाखवून देत असतात. वेळप्रसंगी ते रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मग विध्यार्थी, शेतकरी हितासाठी ते नेहमी लढण्यासाठी तत्पर असतात.
यापूर्वीही आमदार सातपुते यांनी दत्तनगर येथील एका युवकावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करून त्याला जीवदान दिले आहे. या कार्याचे आमदार सातपुते यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. या शस्त्रक्रियेनंतर पांडुरंग राऊत व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सातपुते व रुग्णालयातील आरोग्य सेवक, कार्यकर्त्यांचे आभार मानले.