Aaditya Thackeray : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी झालेल्या धक्का-बुक्कीच्या मुद्द्यावरून ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिदेंसेनेवर निशाणा साधला. या घटनेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला राज्य सरकारमधील त्यांची खरी जागा दाखवून दिली असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना म्हटले की, शिंदेसेनेतील लोक हे भित्र्यांचा समूह आहेत. जेव्हा त्यांना प्रशासकीय फायली दाखवल्या जातात, तेव्हा ते गप्प बसतात. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे हे लोक वठणीवर येतील. सातारा जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान लोकशाहीची हत्या झाली ही मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया हास्यास्पद आहे. जसे पेराल, तसे उगवेल. जैसी करनी, वैसी भरनी. या घटनेने सरकारमध्ये शिवसेना मंत्र्यांची नेमकी जागा काय आहे, हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले होते, यावर बोलताना ते म्हणाले की, हे निलंबन योग्य होते की नाही, याविषयी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राज्य व देशावर परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले पाहिजे. लोकांना कोविड-१९ काळासारख्याच अडचणींचा पुन्हा सामना करावा लागू शकतो, तसेच नागरिकांना पुन्हा एकदा मदत निधीवर अवलंबून राहावे लागेल का? रुपयाची जी सतत घसरण होत आहे, ती सोसणे देशाला परवडण्यासारखे आहे का? असा प्रश्न त्यांनी (Aaditya Thackeray) उपस्थित केला.