मुंबई : याआधी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी भाजपाने देखील केलेली होती. २०१४ च्या आधी भाजपाला देखील मतपत्रिकेद्वारेच निवडणूका हव्या होत्या, मात्र २०१४ नंतर जिंकण्यासाठी त्यांनी असे काही रसायन काढले की, आता चंद्रावर जरी निवडणूका घेतल्या तरी भाजपवाले तिथे जाऊन मतदान करून येतील, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आठवड्याभरापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नाही, अशी माहिती दिली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मनसेच्या मागणीसंदर्भात आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यापुर्वी देखील भाजपने बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. मात्र आता मात्र काहीही होत आहे. कुणी पाच वेळा मतदान करत आहे. मिनता देवी या जगातील सर्वात वयस्कर महिला. दिसतात 25 वर्षांच्या आणि दाखवण्यात आल्या आहेत तब्बल १२४ वर्षांच्या. असे अनेक घोळ आम्ही पकडलेले आहेत. यासोबतच मागच्या आठवड्यात पत्रव्यवहार केला आहे. तसेच गरज पडली तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळेच दिल्लीत आंदोलन व्हीव्हीपॅट काढून टाकण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करत आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने ठरवायचे आहे की, निवडणूका घ्यायच्या आहेत की त्यांच्या ओळखी पाळखीचे जे लोक आहेत, ते जिंकले आहेत, असे जाहीर करून टाकायचे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, नवी दिल्ली ज्या प्रकारे आंदोलन झालं, तसं आंदोलन महाराष्ट्रात देखील होणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मतचोरी विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन होणार आहे. पण सध्या निवडणूक आयोगाचं मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. निर्लज्जपणा हा दिल्लीतून होत आहे, त्यामुळे तिथे आंदोलन करण्यात आलं, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.