मुंबई : मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार होती. मात्र आता आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीएआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधारकार्ड धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 14 डिसेंबर 2024 ही आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यूआयडीएआयने आता ही मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वेळा देण्यात आली मुदतवाढ
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी पहिल्यांदा 14 जून 2024 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देत ती तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची एक संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
UIDAI पोस्टद्वारे दिली माहिती
यूआयडीएआयने ट्विटर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले कि लाखो आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी 14 जून 2025 पर्यंत मोफत ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा कायम ठेवत आहोत. ही सुविधा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. त्यामुळे आता ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती बदलायची आहे. त्यांच्याकडे आता 14 जून 2025 पर्यंतचा वेळ असणार आहे.
ऑनलाईन आधार अपडेट कसे करावे?
1. सर्वप्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर आधार सेल्फ सर्विस पोर्टलला भेट द्या.
2. तुमच्या मोबाइलवर पाठवण्यात आलेला आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी नोंदवा.
3. कागदपत्र अपडेट हा पर्याय निवडा. यानंतर सगळी माहिती नीट वाचा.
4. ड्रॉ- डाऊन सूचीतून आवश्यक कागदपत्रांच्या प्रकाराची निवड करा, पडताळणासाठी मूळ कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करा.
5. यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल, याद्वारे तुम्ही आपले स्टेटस चेक करू शकता.