Aadhaar Card Update: मोबाईल नंबर अन् पत्ता बदलण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, घसबसल्या होणार काम
Aadhaar Card Update: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आपले नवीन आणि अद्ययावत 'आधार ॲप' (Aadhaar) लाँच केले असून, याद्वारे नागरिक घरबसल्या अनेक महत्त्वाची कामे सुरक्षितपणे करू शकणार आहेत.

Aadhaar Card Update: आधार कार्डमधील पत्ता बदलणे असो किंवा मोबाईल नंबर अपडेट करणे, या कामांसाठी आता आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आपले नवीन आणि अद्ययावत ‘आधार ॲप’ (Aadhaar) लाँच केले असून, याद्वारे नागरिक घरबसल्या अनेक महत्त्वाची कामे सुरक्षितपणे करू शकणार आहेत.
सुरक्षितता आणि सुविधेवर भर –
अनेकदा हॉटेल चेक-इन किंवा सिम कार्ड घेण्यासाठी आपण आधार कार्डची फोटोकॉपी देतो, ज्याचा गैरवापर होण्याची भीती असते. ही समस्या लक्षात घेऊन नवीन ॲपमध्ये ‘ऑफलाइन व्हेरिफिकेशन’ची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे तुमचा बायोमेट्रिक डेटा किंवा आधार नंबर शेअर न करताही तुमची ओळख पटवता येईल.
नवीन ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:
मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट: युजर्स ॲपवरून थेट आपला नवीन मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करू शकतात. यासाठी फक्त नाममात्र शुल्क भरावे लागेल.
ऑफलाइन व्हेरिफिकेशन: इंटरनेटशिवाय आणि कागदपत्रे न देता QR कोड स्कॅन करून किंवा पासवर्ड सुरक्षित फाइलद्वारे ओळख पटवता येईल.
कुटुंबासाठी एकच ॲप: एकाच मोबाईल ॲपमध्ये कुटुंबातील ५ सदस्यांचे आधार प्रोफाईल सुरक्षितपणे ठेवता येतील.
सिलेक्टिव्ह डेटा शेअरिंग: तुम्हाला समोरच्या व्यक्तीला फक्त तुमचे नाव आणि वय सांगायचे असेल, तर पूर्ण आधार न दाखवता केवळ तेवढीच माहिती शेअर करण्याची सुविधा यात आहे.
ॲप कसे डाऊनलोड कराल?
१. आपल्या फोनमधील Google Play Store (Android) किंवा Apple App Store (iOS) वर जा.
२. “Aadhaar” (UIDAI चे अधिकृत ॲप) सर्च करा.
३. ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुमची पसंतीची भाषा निवडा.
४. आधार नंबर आणि ओटीपी (OTP) द्वारे लॉग-इन करून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता.
संस्थांसाठी नवीन नियम –
UIDAI ने केवळ नागरिकांसाठीच नाही, तर संस्थांसाठीही कडक पावले उचलली आहेत. आता बँका, हॉटेल्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्सना ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशनचा वापर करण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य असेल. यामुळे डेटाचा गैरवापर थांबण्यास मदत होईल.





