न्हावरे : शिरुर तालुक्यातील मोटेवाडी येथे सुरु असलेल्या कामादरम्यान अचानक विद्युत शॉक लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मयत तरुणाचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे असुन तो मजुरीचे काम करत होता. मोटेवाडी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेचे काम सुरु असताना त्यांना अचानक विद्युत शॉक बसला. या घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शिरुर येथील एका खाजगी हॉस्पिटमध्ये येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मयताचा भाऊ बाबासाहेब महादेव उघडे (वय ३५, व्यवसाय मजुरी, सध्या रा. म्हैसगाव साखर कारखाना, माढा, जि. सोलापूर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.