रोज ऑफिसला विमानाने महिलेचा प्रवास; कारण वाचून व्हालं थक्क…

Super Commuter: भारतीय वंशाची आणि दोन मुलांची आई असलेल्या महिलेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑफिसचे काम आणि कुटुंब यातील संतुलन राखण्यासाठी तिने जो प्रवासाचा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग स्वीकारला आहे, त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.
ऑफिसला जाण्यासाठी रस्ता मार्गे लांबचा प्रवास करण्याऐवजी राचील कौर या रोज पेनांग ते क्वालालम्पूर आणि परत असा रोज विमान प्रवास करतात. त्यांच्या या अनोख्या उपायामुळे त्यांना सुपर कम्प्युटर असे म्हटले जाऊ लागलेले आहे. कौर या एअर एशिया कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात.
रोज ऑफिसला जाण्यासाठी विमान प्रवासाचा अवलंब करण्याचा निर्णय का घेतला याविषयी त्या म्हणतात की, ‘कौटुंबिक जीवन आणि प्रोफेशनल लाईफ यातील संतुलन साधण्यासाठी मी हा निर्णय घेतला. त्यामुळे मला रोज संध्याकाळी मुलांबरोबर वेळ घालवणे शक्य होते. त्याचबरोबर ही व्यवस्था मला परवडणारी आहे. कारण, ऑफिसच्या जवळ भाड्याने घर घेण्यापेक्षा ऑफिसला विमानाने जाणे मला सोयीचे वाटते. मला दोन मुले आहेत. माझा मुलगा बारा वर्षाचा आणि मुलगी अकरा वर्षाची आहे. या वयात त्यांना आईची सर्वाधिक गरज असते असे मला वाटते. त्यामुळे रोज ऑफिस सुटल्यावर विमान प्रवास करून मी घरी पोहोचते आणि नंतर त्यांच्याबरोबर वेळ घालवणे मला शक्य होते.’
2024 पूर्वी त्यांनी क्वालालम्पूर मध्ये त्यांच्या ऑफिसच्या जवळच भाड्याने घर घेतले होते आणि त्या आठवड्यातून एकदा पेनांगला जात असत. मात्र हे अंतर बऱ्यापैकी लांब असल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या याच संतुलन साधने कठीण होत असे. आता त्यांनी विमान प्रवासाचा मार्ग स्वीकारल्याने त्या रोज घरी जातात आणि मुलांसोबत त्यांना वेळ घालवणे शक्य होते. त्यातून वर्क-लाइफ बॅलन्समध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाल्याचे त्यांचे मत आहे.
त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक सांगताना त्या म्हणतात, ‘माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता सुरू होते. पाच वाजेपर्यंत मी घरातील सर्व काम आवरते. आणि ५.५५ पर्यंत विमानतळावर पोहोचते. ठीक ७:४५ वाजता मी ऑफिसमध्ये असते आणि कामाला सुरुवात करते. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता पुन्हा माझ्या विमानाचे लँडिंग होते आणि मी घरी पोहोचते. कुटुंबासोबत गप्पा, जेवण करते. रोजच्या विमान प्रवासामुळे माझ्या आयुष्यातील अनमोल असा वेळ मला उपलब्ध होतो. प्रवासातील वेळेत मी संगीत ऐकते.’
रोजच्या प्रवासाचा खर्च घर भाड्याने घेण्याच्या खर्चापेक्षा कमी
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कौर यांचा रोजचा प्रवासाचा खर्च हा ऑफिसच्या जवळ घर भाड्याने घेण्याच्या खर्चापेक्षा कमी आहे. ऑफिससाठी रोज विमान प्रवास करण्याचा पर्याय स्वीकारल्यामुळे त्यांच्या रोजच्या राहण्यासाठीच्या आणि खाण्यापिण्याच्या मासिक खर्चामध्ये 417 डॉलर वरून 316 डॉलर पर्यंत घट झालेली आहे. म्हणजे त्यांना आधी महिन्याला 42 हजार रुपयांपर्यंत खर्च येत असे तो आता 28 हजार रुपयांवर आलेला आहे.





