वर्दीतील माणुसकीचा हा प्रसंग ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटे उभा राहतील… पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाकड चौकात दोन महिला वाहतूक पोलिसांनी, प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेची रस्त्याच्या कडेलाच सुरक्षित प्रसूती पार पाडली आहे.
या महिलेला प्रसूती वेदना होत असताना रुग्णवाहिका व डॉक्टर यांना पोहोचण्यास उशीर होणार असल्याचं लक्षात आलं आणि वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी धाव घेतली.प्रसूती वेदना होत असलेल्या राजश्री नावाच्या या महिलेला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेडमध्ये नेत तिची प्रसूती सुरक्षितपणे पार पाडली…
राजश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला असून प्रसूतीनंतर आई व बाळाला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात घडलेल्या या घटनेमुळे वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे…वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे…