Child Dies In Accident – सोसायटीच्या आवारात बसविलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिका नवनाथ देवीकर (साडेचार वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हाॅस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. त्यावेळी अचानक लोखंडी घसरगुंडी पडून अनिकाच्या डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहे, याच आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसविली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत वारंवार तक्रार दिली होती. मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करीत आहेत.