PMC News – हडपसर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भैरोबानाला ते यवतपर्यंत मेट्रो आणि वाहतुकीसाठीचा दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी या रस्त्यावर असलेला मगरपट्टा सिटी तसेच गाडीतळ येथील अस्तित्वातील दोन्ही उड्डाणपूल पाडले जाणार आहेत. पुढील सहा ते आठ महिन्यांत हे काम सुरू होण्याची शक्यता असतानाच महापालिकेकडून गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल ५.८६ कोटी रुपयांचा प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती तीन वर्षांपूर्वीच केली आहे. त्यानंतर, पुन्हा त्याच कामासाठी हा खर्च केला जाणार आहे. हे काम मे. संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेंग्थनिंग प्रा. लि. (ठाणे) या कंपनीस देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. दुरुस्तीच्या कामामध्ये उड्डाणपुलावरील विस्तार सांधे, बेअरिंग, भेगा भरणे, इपॉक्सी ग्राउट, कार्बन लॅमिनेट आणि स्कॅफोल्डिंग आदी तांत्रिक कामांचा समावेश आहे. पुणे महापालिका प्रकल्प विभागामार्फत हे काम राबविण्यात येणार असून २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हडपसर परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलाची दुरुस्ती आवश्यक असून, मान्यतेनंतर दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्यशासनाकडून जून २०२५ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीस या भैरोबानाला ते यवत या उड्डाणपूलास मान्यता दिली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये राज्याच्या पायाभूत प्रकल्पांच्या समितीत या पुलास मान्यता दिली असून त्यानंतर या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर पुलाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्यानंतर तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील सहा ते आठ महिन्यांत या नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. तर, या पुलासाठी हडपसर रस्त्यावर असलेले अस्तित्वातील मगरपट्टा पूल तसेच गाडीतळ येथील उड्डाण पूल पाडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे, हे पूल पडणार असले तरी प्रशासनाने गाडीतळ येथील पूल वाहनांसाठी धोकादायक झाल्याचे सांगत स्थायी समितीत त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवलाच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.