अंधश्रद्धेचा महाजाल! इंजिनिअरने भोंदूगिरीला बळी पडून गमावले १४ कोटी, घरदार विकण्याची आली वेळ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीला १४ कोटींस फसवले आहे. विशेष म्हणजे या भोंदू महिलेने अंगात दैवी संचार होत असल्याचे सांगून कोथरूड, तसेच इंग्लडमधील घरात दोष असून, त्यांना घर, शेतजमीन विकण्यास भाग पाडले. घर विकल्यानंतर नातेवाईकांचे घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज काढण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंता, पत्नीने पोलीस आयुक्तालायात अर्ज दिला असून, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
भजनी मंडळात ओळख..
फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे काम पाहत आहेत. संगणक अभियंता कोथरूडमधील एका उच्चभ्रु सोसायटीत राहायला असून एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. पत्नी, दोन मुलींसह ते येथे राहतात. त्यांची एक मुलगी मतिमंद असून, दुसऱ्या मुलीला दुर्धर विकाराने ग्रासले आहे. आर्थिक बाजू चांगली असतानाही मुलींची प्रकृती चांगली नसल्याची खंत या दोघांना होती. दोघेही २०१८ पासून भजनी मंडळात जायचे.
भजनी मंडळातील नागरिकांना त्यांच्या मुलींच्या आजारपणाविषयी माहिती होती. त्यांनी त्यांची एकाशी ओळख करुन दिली. त्याने एक महिला आणि पतीशी ओळख करुन दिली.ही महिला एका बाबांची कन्या असून तिच्या अंगात बाबांचा संचार होतो, असे या दोघांना सांगितले. ती तुमच्यावरील सर्व संकटे दूर करेल, असेही आश्वस्त केले.
घर-दार विकावयास लावले..
त्यानंतर या महिलेने अभियंत्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्या सांपत्तिक परिस्थितचा अंदाज घेतला. त्यानंतर तिने दोन मुलींना घेऊन एकाच्या दरबारात बोलाविले. त्यावेळी तिने अंगात संचार आल्याचा बहाणा करुन २०१९ ते २०२१ या कालावधीत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवू नका, असे सांगून तिने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. अभियंत्याने बँकेतील ठेवी माेडून तिच्या खात्यात पैसे जमा केले. मुलींचा आजार गंभीर असून, आजार बरा होण्यास वेळ लागेल, असेही तिने सांगितले. त्यानंतर मुली बऱ्या न झाल्याने अभियंत्याने विचारणा केली, तेव्हा तुमच्या घरात दोष आहे.
घरातील दोषामुळे मुली बऱ्या होत नसल्याचे सांगितले. तु्म्ही घर विक्री करा. ही रक्कम तुमच्याकडे ठेऊ नका. ही रक्कम आमच्या खात्यात जमा करा. ही रक्कम घरात ठेवल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, असे बाबांनी दृष्टांत दिल्याचे सांगितले. २०२२ मध्ये त्यांनी कोथरूडमधील घराची विक्री केली. ही रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली. बाबा दर्शन देणार आहेत, असे सांगून तिने इंग्लडमधील घर विकण्यास सांगितले. हा अभियंता राहत असलेली आणखी एक सदनिका, शेतजमिनीची विक्री करण्यास भाग पाडल्याचे अर्जात म्हटले आहे.
“याप्रकरणाची तक्रार अद्याप कोथरूड पोलीस ठाण्यात आलेली नाही. याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तालयात देण्यात आला आहे. त्यानुसार विविध बाबी तपासण्यात येत आहे.”
– संदीप देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन





