Indapur : गौरी आगमनाने रेडा गावात भक्तीचा जागर
Indapur : गौरीचे आगमन हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या सामूहिक आनंदाचा सोहळा बनले आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रेडा गावात सालाबादप्रमाणे यंदाही गौरी आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील महिला भगिनी एकत्र येत घरोघरी गौरीचे उत्साहात स्वागत करीत असून, हळदी-कुंकू अर्पण करून गौरीपूजन व जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते कै. सूर्यकांत दगडू गुळवे यांच्या गुळवे परिवारात गौरी-गणपती उत्सव विशेष धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.
गौरी आगमनाच्या निमित्ताने गुळवे परिवाराच्या निवासस्थानी आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास, विविधरंगी पडदे, पारंपरिक अलंकार आणि दीपप्रज्वलनाने सजविण्यात आलेल्या गौरींच्या मूर्ती लक्षवेधी ठरल्या. गौरी-गणपतीसमोर आकर्षक सामाजिक देखावे साकारण्याची गुळवे परिवाराची परंपरा असून, धार्मिक उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देण्याचे काम या उपक्रमातून केले जाते.
गौरीचे आगमन हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या सामूहिक आनंदाचा सोहळा बनले आहे. गावातील महिला भगिनी एकमेकींच्या घरी जाऊन गौरीचे दर्शन घेतात, हळदी-कुंकू अर्पण करतात आणि मंगलमय वातावरणात पूजन करतात. त्यामुळे महिलांच्या परस्पर स्नेहबंधांना, संवादाला आणि सामाजिक एकोप्याला बळ मिळते.
गौरीपूजनाच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने सुवासिनींचा सन्मान, हळदी-कुंकू आणि मंगलागौरच्या परंपरांमधून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. आधुनिक जीवनशैलीच्या धावपळीतही अशा परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व या उत्सवातून अधोरेखित होते. गौरी-गणपती उत्सवाला रेडा गावात केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकीचे माध्यम म्हणूनही पाहिले जाते. गुळवे परिवाराकडून अनेक वर्षांपासून साकारण्यात येणारे सामाजिक देखावे हे त्याचे विशेष आकर्षण ठरत आहेत. देवभक्तीबरोबर समाजभक्ती, संस्कृतीबरोबर सामाजिक जाणीव आणि उत्सवाबरोबर प्रबोधन, असा या परंपरेचा व्यापक आशय आहे.
गावातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने गौरी उत्सव हा महिला सहभागाचेही प्रभावी व्यासपीठ ठरतो. घर, कुटुंब आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर महिलांची भूमिका अधोरेखित करणारा हा सोहळा ग्रामीण सामाजिक जीवनातील परस्पर सहकार्याची परंपरा जपताना दिसतो.
गौरी आगमनाचा हा उत्सव गावातील विविध कुटुंबांना एका भावनिक धाग्यात बांधतो. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कार, महिला सहभाग, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक जतन यांचा सुंदर संगम या उत्सवातून पाहायला मिळतो. गावातील सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात अशा उत्सवांमुळे एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होते.
-अँड. राजू गुळवे.





