संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल, राज्यभर संतापाची लाट; बीड, लातूर, जालन्यात कडकडीत बंद

मुंबई/ बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडेंनी आपल्या पी.ए. व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारत पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे जाहीर केले.
तपास पथकांनी बीड न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील स्व.संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करतानाचे व त्यांच्यावर लघुशंका करतानाचे आरोपींचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद आज विधिमंडळासह राज्यभर उमटले. या फोटोवरून आरोपींच्या क्रृरतेबाबत राज्यभर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली.
बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी 3 ते 17 मार्च या कालावधीसाठी मनाई हुकूम जारी केल्यानंतरही संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली. सकाळपासून बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला. दुसरीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ केजमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धारूर चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. तसेच, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी करण्यात आली. यासह, लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. संतप्त झालेल्या तरुणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला.
पंकजांनी केले राजीनाम्याचे स्वागत
भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता. धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणाऱ्यांनी आधी घेतला असता, तर त्याला गरिमामय एक मार्ग मिळाला असता. खुर्चीवर बसून विचार करताना राज्याच्या प्रत्येकाच सारखाच विचार केला पाहिजे. संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवाराच्या वेदनांपुढे हा निर्णय मोठा नाही. देर आए दुरुस्त आए, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
देवाची काठी लागत नाही, पण न्याय मात्र मिळतो- धस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंची विकेट पडेपर्यंत जी भूमिका घेतली त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो, असे सुरेश धस म्हणाले. देवाची काठी लागत नाही, पण न्याय मात्र मिळतो, हे दिसून आले. मी आता धनंजय मुंडेंच्या आमदारकीबाबत भाष्य करणार नाही. सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली, त्याची सुद्धा एसआयटीने चौकशी करावी, अशी माझी मागणी असल्याचे धस म्हणाले.
आमदारकी रद्द होईपर्यंत पाठपुरावा – दमानिया
तुरुंगात वाल्मीक कराडला जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे ती पहिले बंद करावी. वाल्मीकला जमीनीवर झोपवा. त्याला गुन्हेगारासारखे वागवा. तो वाचावा यासाठी चार्जशीटमध्ये सौम्य भाषेचा उपयोग करण्यात आला आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. यावेळी त्यांना अश्रु देखील अनावर झाले. तसेच, धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करेपर्यंत मी शांत बसणार नाही. संतोष देशमुखांना हीच माझी आदरांजली असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
84 दिवसानंतर नैतिकता सूचली का?- सुप्रिया सुळे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे गायब होतोच कसा असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर धनंजय मुंडेंनी नेमका कोणत्या कारणाने राजीनामा दिला आहे? त्यांना 84 दिवसानंतर नैतिकता सूचली का? असा सवाल त्यांनी केला. जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते कशी? जेलमधील कॅमेरे बंद कसे आहेत?, खंडणी प्रकरणी ईडीने तपास का केला नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुळेंनी केली.





