Nagar | निवडणुकीच्या धामधूमीत संगमनेरमध्ये सापडली गावठी पिस्तुल

संगमनेर, (प्रतिनिधी)– संगमनेर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना संगमनेर येथील एका जणांकडे विनापरवाना असलेली गावठी पिस्तुल सापडली असून यामुळे संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने केली असून यामध्ये 31 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशिष सुनिलदत्त महिरे (वय 28 मुळ रा. सातपुर ता. जि. नाशिक, हल्ली रा. गोल्डन सिटी संगमनेर ता. संगमनेर) हा विनापरवाना असलेले गावठी पिस्तुल संगमनेर येथील कुरण रोड या ठिकाणाहून घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना समजली.
ही माहिती समजताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे व पोलीस नाईक राहुल डोके यांनी कुरण रोड या ठिकाणी छापा टाकून आशिष महिरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की या गावठी पिस्तुलचा माझ्याकडे परवाना नसून मी एका जणाला विकण्यासाठी घेऊन आलो होतो. यावेळी पोलिसांनी या छाप्यात 31 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.





