वाघोली, (प्रतिनिधी)- माझी वाघोली, माझा अभिमान हा संकल्प बाळगून वाघोलीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राव लक्ष्मी फाउंडेशन आयोजित रन फॉर वाघोलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे. दि. 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपक्रमात वाघोलीतील अनेक नागरिक सहभागी होणार असल्याने वाघोलीतील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा हा एक प्रयोग आहे. वाघोलीमधील पिण्याचे पाणी, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, क्रीडांगणे वाहतूक कोंडी, लहान थोर सर्वांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मनपा प्रशासन व महाराष्ट्र शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी रन फॉर वाघोली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर धावणार असून या माध्यमातून वाघोलीकरांच्या प्रश्नाला आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून वाचा फोडली जाणार आहे. उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन वाघोलीकर यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहेच हा उपक्रम पालिकेकडे बाजू मांडणार नागरिक मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊ लागले असून या मोहिमेची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन व राज्य शासन व महाराष्ट्राच्या विधानसभा पटलावर अनेकवेळा लक्षवेधी मांडून वाघोलीकरांसाठी आणि वाघोलीकर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न केल्याने रन फॉर वाघोली हा उपक्रम वाघोलीकरांची बाजू महानगरपालिकेकडे पोहोचवण्यासाठी उपयुक्त असल्याचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.