प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. न्हाहरेमळा येथील शेतकरी प्रकाशशेठ येळवंडे, रमेश थोरात, दत्तात्रेय येळवंडे यांनी जवळपास 12 एकरातील द्राक्षबागांवर कुर्हाड चालवली आहे.सततच्या पावसामुळे द्राक्षबागांमध्ये रोगराई वाढली असून, महागडी औषधे फवारूनही त्याचा कोणताही परिणाम होत नाही. परिणामी द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवीन लागवड करण्याचेही धाडस शेतकरी करत नाहीत. त्यामुळे चांडोली परिसरातील द्राक्षे शेती सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. शेतकरी प्रकाशशेठ गजानन येळवंडे म्हणाले, सहा महिन्यांपासून सतत पाऊस चालूच आहे. कितीही औषधे फवारली तरी रोग जात नाही. शेवटी द्राक्षबाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. शेतकरी रमेश देवराम थोरात म्हणाले, द्राक्षबाग उभी करायला लाखो रुपये खर्च होतात. पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं. बाग वाचवण्यासाठी झोप उडाली, पण काही उपयोग झाला नाही.